अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांनुसार अमेरिकी सैनिकांचा मोठा फौजफाटा अफगाणिस्तानला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर खवळलेल्या तालिबानने अमेरिकेला थेट धमकीच दिली आहे. अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात आले तर अफगाणिस्तान अमेरिकेसाठी कब्रस्तान ठरेल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने ही धमकी दिली आहे. जर अमेरिकेने अफगानिस्तानातून सैन्य मागे घेतले नाहीत तर, लवकरच या महासत्तेसाठी अफगाणिस्तान हे कब्रस्तान ठरेल. युद्धाची योजना आखण्याऐवजी अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय कसा घेता येईल, याची योजना आखायला हवी, अशी दर्पोक्ती जबिउल्लाहने केली आहे. अफगाणिस्तानच्या जमिनीवर जोपर्यंत अमेरिकन सैन्य असेल आणि ते आमच्यावर युद्ध लादत असतील, तोपर्यंत आमचा जिहाद सुरुच राहील, असेही तो म्हणाला.

ट्रम्प हे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य पाठवून लष्करी कारवाई करण्याच्या मागणीचे समर्थक आहेत. आता त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य हटवले तर, तिथे दहशतवादी कारवाया वाढतील अशी भीती व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ३ हजार ९०० सैनिकांना पाठवण्याची तयारी सुरु केली आहे.