अफगाणिस्तानात शनिवारी हमीद करजाई यांचे उत्तराधिकारी ठरवण्यासाठी निवडणूक झाली. लोकशाही मार्गाने सत्ता हस्तांतराचा गेल्या तेरा वर्षांतील हा पहिलाच प्रयत्न आहे. तालिबान्यांच्या हिंसाचाराच्या धमक्यांना न घाबरता मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
सहा हजार मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. शहरी भागात मतदानाचा वेग जास्त होता तर ग्रामीण भागात तो तुलनेने कमी होता. या निवडणुका म्हणजे परदेशांचा कट आहे असे सांगून तालिबानने या निवडणुका फेटाळल्या असून त्यांच्या दहशतवाद्यांना निवडणूक कर्मचाऱ्यांवर, मतदारांवर व सुरक्षा दलांवर हल्ले करण्यास सांगितले होते,
मतदानाच्या वेळी हिंसाचाराची एकच घटना घडली. त्यात स्फोटामध्ये एक ठार तर इतर दोन जण जखमी झाल्याची घटना काबूलच्या दक्षिणेला लोगार प्रांतात घडली असे जिल्हा प्रमुख अब्दुल हमीद हमीद महंमद आघा यांनी सांगितले.
काबूलमध्ये निवडणूक प्रचाराच्या वेळी मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला होता. अंतर्गत सुरक्षामंत्री ओमर दाउदझाई यांनी सांगितले, की चार लाख पोलिस व लष्करी जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. नाटोप्रणीत सैन्यदलांकडून अफगाणिस्तानने याच वर्षी सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली आहे.