अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून निर्माण झालेला पेच सुटण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दृष्टिपथात आलेली नाहीत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला आणि अश्रफ घनी या दोघांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदासाठी जून महिन्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. त्यामध्ये अश्रफ घनी यांना ५६ टक्के मते मिळाल्याचे जाहीर झाले. मात्र या मतमोजणीस अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी तीव्र आक्षेप घेतला. निवडणुकीच्या वेळी अनेक गैरप्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यावर तोडगा म्हणून सुमारे ८००० मतदान केंद्रांतील मतपत्रिकांची पुन्हा पाहणी व मोजणी करण्याचे ठरविण्यात आले. मात्र त्यासही अब्दुल्ला अब्दुल्ला यांचा आक्षेप आहे.
या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी शुक्रवारी अब्दुल्ला अब्दुल्ला व अश्रफ घनी या दोघांचीही भेट घेतली. मात्र या भेटीतूनही काही तोडगा निघू शकला नाही. अमेरिकेला एकत्रित, स्थिर आणि लोकशाहीने चालणारा अफगाणिस्तान हवा आहे. त्यासाठी लोकांना मान्य असलेला अध्यक्ष पदावर असणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया या वादावर केरी यांनी दिली.