अमेठीच्या राजघराण्याच्या संपत्तीचा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि अमेठीच्या राजघराण्याचे वारस संजय सिंह यांच्या पहिल्या पत्नी गरिमा सिंह आपल्या दाव्यासाठी अमेठीतील त्यांच्या ‘भूपती भवन’ या राजमहालात तब्बल १८ वर्षांनी परत वास्तव्यास आल्या आहेत.
गरिमा सिंह यांच्यासोबत त्यांची मुले महिमा (३९), अनंत(३७) आणि शैव्या(३२) देखील आहेत. कायदेशीररित्या संजय सिंह यांची पत्नी असल्याचे म्हणत गरिमा सिंह यांनी राजमहालात आपलाही वाटा असल्याचा दावा केला आहे. तर, संजय सिंह यांनी गरिमा यांना २० वर्षांपूर्वीच घटस्फोट दिल्याचे म्हटले आहे. पण तो घटस्फोट बनावट होता आणि आपण कोणत्याही कागदावर सह्या केल्या नसल्याचे गरिमा यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा घटस्फोट फेटाळला असल्याचेही गरिमा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गरिमा यांनी त्यांची मुले आणि नातवंडांसह राजवाड्याचा ताबा घेतला असून आपल्या हक्काची मागणी करत आहेत.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गरिमा सिंह म्हणाल्या की, “माझ्या कुटुंबाची आणि पतीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी गेली १८ वर्षे मी ब्रसुद्धा काढला नाही. ऐवढी वर्षे मी माझ्या मुलांना योग्य न्याय मिळेल या विचाराने गप्प होते. परंतु, एकूण ७५ खोल्या असलेल्या राजमहालात केवळ दोन खोल्यांमध्ये राहणाऱया माझ्या मुलांचे सामान बाहेर फेकून देण्यात आले तेव्हा आवाज उठविण्याचे मी ठरविले. मी राजासाहेब यांची कायदेशीररित्या पत्नी आहे. आमच्यात अजून घटस्फोट झालेला नाही. त्यामुळे माझ्यासोबत माझ्या मुलांचाही राजमहालावर समान अधिकार आहे. पण, अमिता मोदी (अमिता सिंह) यांना या घरात येण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना मी राजमहालात पाऊल ठेवू देणार नाही.” असेही गरिमा सिंह म्हणाल्या. अमिता सिंह या संजय सिंह यांच्या दुसऱया पत्नी आहेत. त्यामुळे या राजघराण्याच्या संपत्ती वादाला आता रंजक वळण मिळाले आहे.