हैदराबादमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने तीन अंध मुलांना बेदम मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कोलकात्यामध्ये घरी शिकविण्यास येणाऱ्या शिक्षिकेने तीन वर्षांच्या मुलास क्रूरपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद झाला असून, त्याप्रमाणे पोलीस कारवाई करणार आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही शिक्षिका मुलास क्रूरपणे मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. या मुलाचे आई-वडील त्या वेळी घरी नव्हते. लेकटाऊन पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक सेन यांनी सांगितले की, आमच्याकडे याबाबत तक्रार आली होती. त्यानंतर आम्ही या प्रकाराची चौकशी केली. मुलाच्या कुटुंबीयांनी या शिक्षिकेविरुद्ध तक्रार केली होती. शिक्षिकेला नेमून काही दिवसच झाले होते. नंतर या शिक्षिकेने माफी मागितली आणि पोलिसांत तक्रार करू नका, अशी विनंती केली. तिच्या पतीने येऊनही मुलाच्या कुटुंबीयांना तक्रार न देण्यासाठी धमक्या दिल्या होत्या.