थिरुवनंतपूरम- केरळचे अर्थमंत्री के. एम. मणी यांच्याविरुद्धच्या बार भ्रष्टाचार प्रकरणाला गुरुवारी निराळे वळण लागले. तपास यंत्रणेने सादर केलेला अंतिम अहवाल स्वीकारण्यास विशेष न्यायालयाने नकार देऊन या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिल्याने दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोचे संचालक व्हिन्सेण्ट एम. पॉल हे रजेवर गेले आहेत. सदर प्रकरण बंद करावे हा तपास यंत्रणेचा अहवाल स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिल्याने संचालक पदावर राहणे योग्य नाही, असे पॉल यांनी म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, पॉल यांचा रजेचा अर्ज अतिरिक्त मुख्य सचिवांनी (गृह) स्वीकारला आहे. पॉल यांचा सेवाकाळ केवळ एक महिना राहिलेला आहे. आपण पदावर राहिल्यास संशयाचे वातावरण निर्माण होईल, त्यामुळे या पदावर राहणे योग्य नाही, असे पॉल म्हणाले. आपण या प्रकरणात कायद्याच्या चौकटीतच काम केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.