गत तीन वर्षांत केंद्र सरकारने ५० हजार कोटींचा काळा पैसा बाहेर काढल्याचा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे हे सरकारचे सर्वांत मोठे यश असल्याचे सांगत नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशाच्या महसुलात तब्बल ७ लाख कोटींची वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. २०१४ मध्ये १३ लाख कोटींचा महसूल मिळाला होता. आता तो २० लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी म्हटले. मोदी सरकारला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त तीन वर्षांतील सरकारच्या कामगिरीची माहिती त्यांनी ‘इंडिया टीव्ही’शी बोलताना सांगितली.

पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या मदतीने आपण ३ लाख ८५ हजार कोटी रूपयांचे थकीत काम मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. मी प्रत्येक राज्य सरकारला मदत करतो. मार्च २०१७ पर्यंत मी ६ लाख कोटी रूपयांच्या कामांचे वाटप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात. तीन तासांत ठेकेदाराच्या हातात कागद असतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारला तीन वर्ष झाल्यानिमित्त मंत्रिमंडळाला सरकारने राबवलेल्या विविध योजनांची व त्यांच्या यशाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमही आखण्यात आला आहे. भाजप २६ मे ते १५ जूनपर्यंत मोदी फेस्टिव्हल साजरा करणार आहे. देशातील ९०० शहरांमध्ये हा उत्सव साजरा केला जाईल. पंतप्रधान मोदी सामान्य नागरिकांसाठी दोन कोटी पत्र लिहिणार आहेत. १५ दिवसांत १० कोटी एसएमएस केले जातील. ५०० शहरांमध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.