दहशतवादाला प्रोत्साहन देण्यावरून पाकिस्तानवर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र (यूएन) संघाच्या सभेत दहशतवादावर हल्ला केल्यानंतर आता अफगाणिस्ताननेही याप्रकरणी इस्लामाबादवर निशाणा साधला आहे.

अफगाणिस्तानने मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप केला. दीर्घ कालावधीपासून इस्लामाबाद दहशतवादाला आश्रय देत असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले. अफगाणिस्तानचे विदेश मंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी दहशतवादाचे मूळ त्यांच्या सीमेबाहेर असल्याचे म्हटले. या प्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिक्सचे सदस्य देश, जपान आणि भारतानेही पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता.

रब्बानी म्हणाले, अफगाणिस्तानचा शेजारील देश काबूलला अस्थिर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना मदत करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानवर चर्चा करताना काबूलने पाकिस्तानबरोबरील वादग्रस्त मुद्दे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पाकिस्तानकडून कोणतेही सकारात्मक उत्तर आले नव्हते, असेही ते म्हणाले.

रब्बानी यांनी ट्रम्प यांच्या अफगाणिस्तान नीतिवर चर्चा करताना म्हटले की, नव्या धोरणांमुळे अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. आम्ही ट्रम्प यांच्या धोरणाचे स्वागत करत आहोत. आमच्या परिसरात दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा खात्मा होण्याची गरज आहे.

सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा देश असल्याचे म्हटले होते. मागील ७० वर्षांमध्ये भारताने विकास साधला. मात्र पाकिस्तानने दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केले असे म्हणत पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेतील मंचावरून खडे बोल सुनावले होते. भारताने वैज्ञानिक, डॉक्टर, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ घडवले, पाकिस्तानने काय घडवले तर फक्त दहशतवादी आणि दहशतवादी संघटना, अशी टीका त्यांनी केली होती.

निष्पाप लोकांचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानने भारताला माणुसकीचे धडे शिकवण्याची गरज नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी हे जेव्हा भारताच्या विरोधात गळा काढत होते तेव्हा इथे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हाच प्रश्न होता की, ‘हे कोण बोलत आहे बघा?’ पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दहशतवादी तयार करण्यासाठी जे पैसे खर्च केले ते जर देशाच्या विकासासाठी खर्च केले असते तर त्यांची प्रगती तरी झाली असती, असे त्यांनी म्हटले होते.