काँग्रेसने अव्हेरलेले माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्या स्मारकासोबतच इतर माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ नवी दिल्लीत ‘एकता स्थळ’ म्हणून स्मारक बांधण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे. पी.व्ही.नरसिंह राव यांच्यासोबतच माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचेही स्मारक बांधण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.
देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान करण्याचा विचार केंद्राने केला असल्याचे नगर विकास आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, पी.व्ही.नरसिंह राव हे महान नेते आणि देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान होते. संपूर्ण पाच वर्षे पंतप्रधान कार्यालयात नेहमी हजर असणारे आणि प्रचंड मेहनत घेणारे नेते होते. मात्र, केवळ नरसिंह राव यांच्याच योगदानाचा विचार करून चालणार नाही. इतर माजी पंतप्रधानांचेही देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे सर्व माजी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्मारक व्हायला हवे, असेही ते पुढे म्हणाले. मोरारजी देसाईंनी २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ या काळात देशाचे नेतृत्त्व केले होते. वयाच्या ९९ व्या वर्षी १९९५ साली देसाईंचे मुंबईत निधन झाले.
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे दिल्लीत स्मारक
दरम्यान, काँग्रेसला खिजवण्यासाठीच एनडीए सरकार नरसिंह राव यांच्या स्मारकासाठी क्रियाशील झाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने राव यांच्या निधनानंतर अंत्यविधी दिल्लीत करू न देता आपल्याच पंतप्रधानाचा अपमान केल्याची टीका एनडीएकडून याआधीपासून होत आली आहे.