पेशावरमधील शाळेमध्ये घुसून तालिबानी दहशतवाद्यांनी चिमुरडय़ा विद्यार्थ्यांसह १४० जणांचे निर्घृण हत्याकांड घडविले.. या घटनेच्या धक्क्यातून पाकिस्तान अद्यापही सावरलेला नसून, बुधवारी पाकिस्तानात सर्वत्र सामूहिक श्रद्धांजली वाहिली. या १४० जणांचे सामुहिक दफन केले असून, सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला.

विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळ्या
विद्यार्थ्यांवर हल्ला करताना तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अगदी जवळून डोक्यात गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. निमलष्करी दलाच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी वारसक रोड येथे असलेल्या शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी कबरस्तानाच्या बाजूने शाळेच्या आवारात उडय़ा मारल्या. नंतर ते वर्ग व ऑडिटोरियमकडे गेले आणि तेथे गोळीबार केला.
ल्ल दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या १३२ विद्यार्थी व नऊ शिक्षकांवर बुधवारी सुन्न वातावरणात सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले. दफनविधीला विविध स्तरावरील लोक दफनभूमीत जमले होते. राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होती. दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन काही राजकीय नेत्यांनी या वेळी केले.

*राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. देशाच्या अन्य भागांतील शाळा सुरू होत्या, मात्र तिथे भयाण शांतता होती. मृतांना श्रद्धांजली वाहून या शाळांना सुरुवात झाली. इस्लामाबाद, रावळपिंडी येथे मृतांना आदरांजली वाहण्यासाठी मेणबत्ती शोकफेरीचे आयोजन केले होते.

*पेशावर राजधानी असलेल्या खबर-पख्तुनवाला प्रांतातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बुधवारी बंद करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानातील अनेक भागांत व्यापाऱ्यांनी उस्फूर्त बंद पाळला होता. देशातील सर्व सरकारी आस्थापने बंद होती.

पाकिस्तानी तालिबानी
*पाकिस्तानी तालिबानचे अतिरेकी मुख्यत: दक्षिण वझिरीस्तानात आहेत ते वायव्य आदिवासी भागात राहतात. हा भाग अफगाणिस्तान सीमेजवळ आहे. ‘तालिबान’चा पश्तू भाषेतील अर्थ ‘विद्यार्थी’ असा होतो.
*तालिबान १९९६ पासून अफगाणिस्तानात कार्यरत आहे. त्यात सामील असलेले दहशतवादी अफगाणी पश्तू समूहातील आहेत. अफगाणिस्तानात रशियाने आक्रमण केले तेव्हापासून त्याची बीजे रोवली गेली होती. पाकिस्तानने अफगाण युद्धात अमेरिकेची साथ दिल्याने त्यांचा पाकिस्तानी सरकारवर राग आहे.
*२००७ पर्यंत ‘पाकिस्तानी तालिबान’ची अधिकृत स्थापना झाली नव्हती. पाकिस्तान व अमेरिकेविरोधात भूमिका असलेले गट मिळून पाकिस्तानी तालिबान तयार झाले आहे. गेल्या काही महिन्यात पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी तालिबानचे कंबरडेच मोडले असून अमेरिकच्या ड्रोन हल्ल्यांनी त्यांना जेरीस आणले आहे. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला असून त्याने नोबेल विजेती शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिच्यावरच्या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
*तेहरिक ए तालिबान पाकिस्तानने पाकिस्तानी सरकार उलथवून इस्लामी कायदा प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांना अफगाणी तालिबानची साथ आहे. अल काईदाचे अतिरेकी वायव्य पाकिस्तानात आहेत, त्यांचीही पाकिस्तानी तालिबानला साथ आहे. त्यांनी अलीकडेच कराची विमानतळावर हल्ला केला होता व आतापर्यंतच्या हिंसाचारात दहा हजाराहून अधिक लोक ठार झाले आहेत. मंगळवारचा हल्ला सर्वात भीषण होता.
*तालिबान्यांचा म्होरक्या फजलुल्ला याला ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ हे काबूलला गेले आहेत. ते अफगाणी नेत्यांशी व नाटो दलांशी चर्चा करीत आहेत. आता दहशतवादाच्या प्रकरणात मृत्युदंडाची रद्द केलेली शिक्षा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तालिबानी हल्ल्यात पाकिस्तानने ४००० सैनिक गमावले असून हजारो जखमी झाले आहेत. पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर अनेकदा कारवाई केली, पण त्या प्रत्येकवेळी त्यांनी चवताळून उलट हल्ले केले आहेत. २०१३ मध्ये नवाझ शरीफ सत्तेवर आले तेव्हा त्यांनी तालिबानशी वाटाघाटींची तयारी दर्शवली होती.