पाकव्याप्त काश्मिरातील लष्करी कारवाईनंतर पंजाब आणि जम्मूतील सीमावर्ती भागातील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या भागातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, वाघा सीमेवर दररोज होणारा ‘बीटिंग रिट्रीट’ हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक राहणाऱ्या दहा किमी परिघातील गावांतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी निघून जाण्याचे आदेश आम्ही दिले असून शाळांनाही सुट्टी देण्यात आल्याची माहिती जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी दिली. जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्य़ातील गावांमधील रहिवाशांना हा इशारा देण्यात आला असून आरएस पुरा भागातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कारवाई सुरूही झाल्याचे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले. पंजाबातील सहा जिल्हे पाकिस्तानी सीमेला लागून आहेत. या सर्व गावांतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश लष्कराकडून देण्यात आल्याचे लष्करी प्रवक्त्याने स्पष्ट केले.