भारताकडून संयुक्त राष्ट्र संघात टेररिस्तान असा उल्लेख करण्यात आल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने ‘भारतच दहशतवादाची जननी’ असल्याचा कांगावा केला आहे. ‘भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे,’ असे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलीहा लोधी यांनी म्हटले. भारताकडून पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना पाकिस्तानचा बुरखा फाडला. ‘भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यापासून भारताने आयआयटी, आयआयएम, एम्स यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभारल्या. मात्र पाकिस्तानने केवळ दहशतवादी संघटना उभारण्यातच धन्यता मानली,’ अशा कठोर शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. स्वराज यांच्या या टीकेमुळे पाकिस्तानचा संताप झाला आहे. भारताला रोखण्याचे आवाहन पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्यात आले आहे. ‘दोन शेजारी देशांमधील संघर्ष टळवा, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत असल्यास त्यांनी भारताला आक्रमक कारवाया कमी करण्याच्या सूचना कराव्यात,’ असा कांगावा पाकिस्तानने केला.

‘भारत आणि पाकिस्तानमधील धोकादायक संघर्ष टाळायचा असल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला आक्रमक कारवाया कमी करण्याचा सल्ला द्यावा. नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याच्या सूचना भारताला द्याव्यात. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना सहाय्य करणे बंद करावे,’ असे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलीहा लोधी यांनी म्हटले. अनेकदा अशा प्रकारचे प्रत्युत्तर परराष्ट्र सेवेतील कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून दिले जाते. मात्र पाकिस्तानच्या राजदूतांनी या प्रकारची प्रतिक्रिया दिल्याने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

शनिवारी सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघात बोलताना पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली. ‘भारत डॉक्टर, अभियंते निर्माण करत असताना पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि हक्कानी नेटवर्क यांच्यासारख्या दहशतवादी संघटना निर्माण केल्या,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला चढवला. याला प्रत्युत्तर देताना, स्वराज यांनी काश्मीरचा मूळ मुद्दा बाजूलाच ठेवला, असे लोधी यांनी म्हटले.