पाकिस्तानच्या पेशावरमधील ‘आर्मी पब्लिक स्कूल’मध्ये नववीत शिकणाऱ्या अब्दुल्ला या १४ वर्षीय विद्यार्थ्यांच्या वडिलांचा हा आक्रोश रुग्णालयातील साऱ्यांचे हृदय पिळवटून टाकत होता. सहा दहशतवाद्यांनी मंगळवारी या शाळेवर केलेल्या हल्ल्याने या क्रूरकम्र्यात माणूसपणा उरला नसल्याचे अधोरेखित केले. शिक्षणाच्या वाटेवरून पुढे जात उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रंगवणाऱ्या निष्पाप, नि:शस्त्र विद्यार्थ्यांच्या डोक्यात, छातीत गोळय़ा झाडणाऱ्या तालिबान्यांच्या चेहऱ्यावर हिंस्र पशूचेच भाव झळकत होते.

फोटो गॅलरी : पेशावरमध्ये तालिबान्यांचा उच्छाद 

पेशावरच्या वारसाक रस्त्यावरील सेंट मेरी हायस्कूलवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना आधीच मिळाली होती, मात्र त्या इशाऱ्याला फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. त्याचाच फायदा तहरीक ए तालिबानच्या दहशतवाद्यांनी घेतला. ‘आर्मी पब्लिक स्कूल’ला लागून असलेल्या कब्रस्तानाच्या भिंतीवरून उडय़ा मारून हे दहशतवादी शाळेत शिरले व हल्ला सुरू केला. दहशतवाद्यांनी वर्गावर्गात जाऊन अंदाधुंद गोळीबार केला. एका विद्यार्थ्यांने सांगितले की, हल्लेखोरांना लांब दाढय़ा होत्या व त्यांनी सलवार कमीझ हा वेश परिधान केला होता. ते अरबी भाषा बोलत होते व परदेशी होते.  
 शाळेजवळ राहणाऱ्या शगुफ्ता हिने ‘जिओ’ टीव्हीला सांगितले की, आपण स्फोटांचे दोन आवाज ऐकले. त्यातील एक मोठा आवाज होता.

तालिबानी क्रौर्याची परिसीमा 

चौथीतील विद्यार्थी शुजा याने सांगितले की, परीक्षा चालू असताना गोळीबार झाला. शिक्षकांनी आम्हाला जमिनीवर पडण्यास सांगितले. लष्कराचे जवान येईपर्यंत आम्ही तेथे होतो, नंतर बाहेर पडू शकलो. अनेक मुले मागच्या दाराने बाहेर पडली, असे ‘दुनिया’ टीव्हीने म्हटले आहे. गोळीबार झाला, तेव्हा शाळेतील चौथा तास सुरू होता. प्रथम काय झाले ते कळेना, नंतर लष्करी अधिकाऱ्यांनी हल्ला झाल्याचे सांगितले व मागील दाराने जाण्यास सांगितले, असे एक  विद्यार्थी म्हणाला.

बेस्लान ओलीसनाटय़ाच्या कटु स्मृती
पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यामुळे २००४ मध्ये रशियात चेचेन बंडखोरांनी बेस्लानमधील शाळेत केलेल्या हत्याकांडाच्या कटु स्मृती जाग्या झाल्या. या हल्ल्यात चेचेन बंडखोरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर केलेल्या हत्याकांडात ३३० जण ठार झाले. मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. बेस्लानमधील ओलीसनाटय़ १ सप्टेंबर २००४ रोजी सुरू झाले होते. ३२ जणांनी शाळेतील एक हजार जणांना ओलीस ठेवले होते. ३ सप्टेंबरला हे ओलीसनाटय़ संपले, परंतु तत्पूर्वी मोठी जीवितहानी झाली होती. पेशावरमधील हल्ल्यामुळे बेस्लानमधील ओलीसनाटय़ाची शहारे आणणारी आठवण जागी झाली.