बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपच्या हातमिळवणीचा फटका राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनंतर आता महाआघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशांत किशोर यांना बसला आहे. बिहारमधील महाआघाडीचे सूत्रधार असणाऱ्या प्रशांत किशोर यांची नितीश कुमार यांनी हकालपट्टी केली आहे. भाजपसोबतच सत्ता स्थापन करताच नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना ‘नारळ’ दिला आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. यासोबतच महाआघाडीचे मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांची नेमणूक सल्लागार म्हणून केली होती. मात्र नितीश कुमार भाजपसोबतच जाताच नितीश कुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. न्यूज १८ ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी प्रशांत किशोर यांना नारळ दिला आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हेच प्रशांत किशोर यांच्या हकालपट्टीमागील प्रमुख कारण आहे. सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होताच नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना मोठा झटका दिला. प्रशांत किशोर वर्षभरापासून बिहारमध्ये नव्हते, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एप्रिल २०१६ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी प्रशांत किशोर पंजाबला गेले होते. त्याचवेळी किशोर यांनी त्यांचा राजीनामा नितीश कुमार यांच्याकडे सोपवला होता. मात्र त्यावर त्यांनी कोणतीही तारीख नमूद केलेली नव्हती, अशी चर्चा आहे.

२०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रशांत किशोर आणि नितीश कुमार संपर्कात आले होते. प्रशांत किशोर यांनीच नितीश कुमार आणि संयुक्त जनता दलाच्या प्रचाराची रणनिती आखली होती. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांना एकत्र आणण्याची कामगिरी त्यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. महाआघाडीला मिळालेल्या महाविजयात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच किशोर यांची नेमणूक सल्लागार पदावर केली होती.