पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी अमेरिका दौरा अनेक कारणांनी गाजताना दिसत आहे. या चार दिवसीय अमेरिका दौऱ्यात २७ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वार्षिक महासभेपुढे भाषण करणार आहेत. त्यानंतर सन २००१मध्ये दहशतवादी हल्ल्याचे केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क येथील ‘ग्राऊंड झीरो’ या ठिकाणाला ते भेट देणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. याच ठिकाणी असणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्वीन टॉवर्सवर ११ सप्टेंबर ,२००१ रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. ‘ग्राऊंड झीरो’ला भेट दिल्यानंतर नरेंद्र मोदी ओबामा यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ९/११ हल्ल्याच्या स्मृती संग्रहालयातही जाणार आहेत.  
गुजरात दंगलीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या महिन्यात त्यांच्या देशातील भेटीचे आवतण दिले होते. अमेरिका मोदी सरकारबरोबर द्विपक्षीय संबंधात एकविसाव्या शतकात अर्थपूर्ण भागीदारी करू इच्छिते, असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते. त्यानंतर या दौऱ्यातून काहीतरी ठोस निष्पन्न होईल व धोरणात्मक भागीदारीला ऊर्जितावस्था प्राप्त होईल अशी आशाही मोदींनी व्यक्त केली होती.