उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर विदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. यूपीचे निकाल समोर आल्यानंतर भारतातील इक्विटी आणि रोखे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ५४,२५५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. एका महिन्यात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून जुलै २०१४ मध्ये सर्वाधिक ३६,०४५ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. विदेशी गुंतवणूकदारांकडून इक्विटी बाजारात एकूण ३०,२०३ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आणि कर्ज रोख्यात २४,०५१.९ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली.

यापूर्वी इक्विटी मार्केटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक वर्ष २०१० मध्ये २८,५६३ कोटी इतकी तर कर्ज रोख्यात २२,९३५ कोटी रूपयांची गुंतवणूक जुलै २०१४ मध्ये झाली होती. त्यावेळी मोदी सरकार सत्तेवर आले होते. नुकताच झालेल्या ५४,२५५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीने पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी निवडणूक निकालांमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल वाढले असल्याचे मत नोंदवले आहे. राज्य आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असल्याने गुंतवणूकदारांना राजकीय स्थिरता दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूदारांचा विश्वास वाढला आहे. विदेशी गुंतवणूदारांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. याचे सर्व श्रेय वर्तमान सरकारला जात असल्याचे एशियन इक्विटी स्ट्रटेजिस्टचे व्यवस्थापकीय संचालक मनीष रायचौधरी यांनी म्हटले आहे.
विदेशी गुंतवणुकीत झालेल्या या वाढीमुळे बीएसई आणि एनएसईवरही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजाराच्या सुरूवातीच्या सत्रात १७ मार्च रोजी वाढ दिसून आली होती. सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वाधिक २९,६४८ अंकावर तर निफ्टी ९,६१० अंकावर बंद झाला होता. त्याचबरोबर रूपयाही डॉलरच्या तुलनेत १७ महिन्यांत सर्वात मजबूत झाला. देशातील विधानसभा निवडणुकीनंतर बाजारात तेजी पाहण्यास मिळाली होती.