अफजल गुरुला फाशी देण्यात आल्याचे आम्हाला टीव्हीवरून समजल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी शनिवारी सागितले. अफजलचा मृतदेह आमच्याकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, तिहार कारागृहातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार अफजलचा मृतदेह तुरुंगातच दफन करण्यात आला आहे.
मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा आहे. त्यांचा मृतदेह आमच्याकडे द्यावा. आम्हाला त्यांना इथेच दफन करायचे आहे, अशी मागणी अफजल गुरुचा १४ वर्षांचा मुलगा गालिब याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना केली. गालिब हा सध्या त्याचे आजोबा गुलाम मोहम्मद बु-हो यांच्यासोबत राहातो. बारामुल्ला भागात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे आम्हाला आमच्या घरातून बाहेर पडता येत नाहीये, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही पोलिसांना फोन केला आणि आम्हाला अफजल गुरुच्या जुन्या घरी जाऊ द्यावे, अशी विनंती त्यांच्याकडे केली. मात्र, पोलिसांनी आम्हाला घराबाहेर पडू देण्यास नकार दिल्याचे बु-हो म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खोटे बोलता आहेत. आम्हाला अफजल गुरुच्या फाशीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असाही आरोप त्यांनी केला.