संसदेवर १३ डिसेंबर रोजी केलेल्या हल्ल्याची लाज बाळगू नका.. या हल्ल्याला कट असे तर मुळीच संबोधू नका.. तो जर कट होता तर काश्मीरमुक्तीसाठी चाललेली संपूर्ण चळवळ म्हणजेच एक कट आहे असाच त्याचा अर्थ होईल.. काश्मीरप्रश्नाचे निराकरण होत नाही तोपर्यंत भारतीय राज्यकर्त्यांना खोऱ्यात कायमची शांती कधीच लाभणार नाही.. हे पत्र आहे अफजल गुरूचे. येथील उर्दू साप्ताहिकाचे संपादक शबनम कयूम यांना त्याने चार वर्षांपूर्वी पाठवले होते.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या अफजल गुरूला ९ फेब्रुवारी रोजी फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर आता या साप्ताहिकात गुरूचे हे पत्र प्रकाशित झाले आहे. हे पत्र गुरूचेच असून चार वर्ष मुद्दामच ते प्रकाशित केले नव्हते असे संपादक कयूम यांनी सांगितले. गुरूने साप्ताहिकाकडे अनेक पत्रे तसेच लेख पाठवले होते. त्यामुळे पत्र त्याच्याच हस्ताक्षरातील आहे यात शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याच्या फाशीपूर्वी पत्र प्रकाशित केले असते तर त्याच्याविरोधातील पुरावा आणखी पक्का झाला असता, त्यामुळेच पत्र मुद्दाम प्रकाशित केले नसल्याचे ते म्हणाले. गुरूने हे पत्र हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सईद सलाहउद्दिन याला उद्देशून लिहिले आहे. सलाहउद्दिनने संसदेवरील हल्ल्याची लाज बाळगू नये तसेच या हल्ल्याची जबाबदारीही झटकू नये असे या पत्रात गुरूने लिहिले आहे. या हल्ल्याची जबाबदारी मात्र त्याने स्वीकारलेली नाही.