पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; सहा हजार कोटी रुपयांची तरतूद

शेतमालाला अधिक उठाव मिळावा तसेच कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अशा कृषी योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. कृषी-सागरी प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया उद्योग विकास (संपदा) असे या योजनेचे नाव आहे. केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

येथील धमाजी जिल्ह्य़ात भारतीय कृषी संशोधन संस्थेचा (आयसीएआर) कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. या वेळी पंतप्रधानांनी येत्या पाच वर्षांत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. शेतमालाला अधिकाधिक उठाव मिळावा तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी यासाठी ‘संपदा’ योजना आखण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया उद्योगाचा विकास होण्यास मदत होईल आणि त्या माध्यमातून तरुणांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेसाठी केंद्रातर्फे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कालांतराने त्यात परकीय गुंतवणुकीच्या साह्य़ाने पतपुरवठा केला जाणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शेतमालावर प्रक्रिया करून बाजारपेठेत पाठवणे तसेच कृषी-सागरी प्रक्रियेला उत्तेजन देण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

२०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या हरितक्रांतीऐवजी ‘सदाकाळ हरितकाळ’ यावर आमचा भर राहणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.  नरेंद्र मोदी, पंतप्रधान