परवाना नसलेले अप्रमाणित कीटकनाशक बाजारात आल्याने यवतमाळमध्ये फवारणीदरम्यान शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. कृषी मंत्रालय यासाठी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शरद पवार यांचे सोमवारी नागपूरमध्ये आगमन झाले. नागपूरवरुन पवार अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. विमानतळावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या मृत्यूवरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आघाडी सरकारच्या काळात फवारणीदरम्यान एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही असा दावा करत पवार म्हणाले, कीटकनाशक संबंधी स्वतंत्र संस्था आणि कायदा अस्तित्वात आहे. कीटकनाशकाच्या विक्री आणि नियंत्रणाकरता या संस्था अस्तित्वात असून त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही कीटकनाशकाची विक्री शक्य नसते, असे ते म्हणालेत. अप्रमाणित कीटकनाशक बाजारात आल्यानेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून यासाठी कृषी मंत्रालय जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. आमच्या काळात जे नियमांचे उल्लंघन करुन विक्री करायचे, त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई केली होती, अशी आठवण त्यांनी करुन दिली.

परतीच्या पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनचे नुकसान झाले असून सरकारने नियमांचा विचार न करता शेतकऱ्यांना मदत करावी असे पवार यांनी सांगितले. कर्जमाफीचे नियोजन झाले नसून कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पत्र आले आहे. या योजनेतील सुधारणांसाठी आम्ही सरकारला १०ते १५ दिवसांचा वेळ देणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी यवतमाळचा दौरा केला होता. कीटकनाशक फवारणी बळी प्रकरणात मान्यता नसलेली अतिविषारी कीटकनाशक विकणारे, तसेच उत्पादक कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले होता.