विक्रेत्यांकडून फायद्यासाठी फळे आणि भाज्या कृत्रिम पद्धतीने पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात आल्याच्या अनेक घटना आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो. मात्र, केंद्रीय कृषीमंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सरकारी पातळीवरूनच या गोष्टीला दुजोरा मिळाल्यामुळे आता सामान्यांना बाजारातील फळे आणि भाज्या सेवनासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न पडला आहे. या अहवालासाठी देशभरातील घाऊक आणि किरकोळ दुकानांमधून जमा केलेल्या १२.५ टक्के नमुन्यांमध्ये, ज्यांच्या वापरास मान्यता नाही, अशा कीटकनाशकांचे अंश आढळल्याची धक्कादायक बाब या अहवालाने प्रकाशात आणली आहे. विशेष म्हणजे, जैविक असल्याचा दावा करणाऱ्या अन्नपदार्थांमध्येही कीटकनाशकांचा अंश आढळला आहे. तपासणी झालेल्या २०,६१८ नमुन्यांपैकी १२.५ टक्के नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीवर असल्याची स्पष्ट झाले आहे.
भाज्यांच्या ११८०, फळांच्या २२५, मसाल्याच्या ७३२, तांदळाच्या ३०, डाळीचे ४३ नमुने तपासणीसाठी मागवण्यात आले होते. त्यात या कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीपर्यंत असल्याच उघड झाले आहे. भाज्यांमध्ये अ‍ॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लिझ ही कीटकनाशकं सापडली असून फळांमध्ये अ‍ॅसिफेट, अ‍ॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस इत्यादी कीटकनाशकांचा अंश आढळला. याशिवाय, सुमारे ५४३ नमुन्यांत २.६ टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.