ऑगस्टा-वेस्टलॅण्ड कंपनीसमवेत करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात देण्यात आलेल्या दलालीप्रकरणी अटक करण्यात आलेले उद्योगपती गौतम खेतान यांचा जामीन अर्ज बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला.
न्या. व्ही. पी. वैश यांनी खेतान यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर खेतान यांना जामिनासाठी नव्याने अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे.
या प्रकरणातील प्रतिवादी अंमलबजावणी संचालनालयाला तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपास अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला असल्याचे कारण देत न्यायालयाने २० ऑक्टोबर रोजी खेतान यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्याला खेतान यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.