ऑगस्टा-वेस्टलॅण्ड कंपनीसमवेत करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी करारात जी अनियमितता झाली त्याची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे शुक्रवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेत सांगितले.
या करारात मोठय़ा प्रमाणावर दलाली देण्यात आल्याने तो करार रद्द करण्यात आला आणि सध्या त्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत सीबीआय चौकशी करीत असून माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह अन्य १३ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असेही पर्रिकर म्हणाले.
१५ डिसेंबरला सुनावणी
ऑगस्ट वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी करारातील अनियमिततेप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने उद्योगपती गौतम खेतान आणि अन्य काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून त्यावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने दिला.
याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने सादर केलेल्या दस्तऐवजांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही वेळ लागणार आहे, असे स्पष्ट करून विशेष न्यायमूर्ती व्ही. के. गुप्ता यांनी १५ डिसेंबर ही तारीख मुक्रर केली.