ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदीच्या ३६०० कोटी रुपयांच्या खरेदी व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात माजी हवाईदलप्रमुख एस.पी. त्यागी यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी पाचारण केले आहे. अशा रीतीने एखाद्या केंद्रीय तपास यंत्रणेने देशाच्या माजी वायुदलप्रमुखांना चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार त्यागी यांच्या नावे समन्स जारी केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यासमोर त्यागी यांनी हजर होण्याची नेमकी तारीख उघड करण्यात आली नसली, तरी त्यांना पुढील आठवडय़ात ‘वैयक्तिकरीत्या’ हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे कळते.
सीबीआयने यापूर्वी त्यागी यांना याच प्रकरणात चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी आपण या प्रकरणात काही चुकीचे केल्याचे नाकारले होते.
इटलीतील मिलान येथील न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालात फिनमेकानिका कंपनीचे माजी प्रमुख ग्युसेप ओर्सी व माजी सीईओ ब्रुनो स्पँगोलिनी यांना भारताला १२ हेलिकॉप्टर्स विकण्याच्या व्यवहारात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवून शिक्षा दिलेली असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यागी यांची चौकशी आवश्यक ठरली असल्याचे संकेत सूत्रांनी दिले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर्स खरेदी करावयाच्या व्यवहारात ऑगस्टा वेस्टलँडचा समावेश व्हावा यासाठी त्यागी यांनी या हेलिकॉप्टर्सची उंची कमी करायला लावली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

संरक्षण मंत्रालयाविरुद्ध काँग्रेसची हक्कभंग नोटीस
संसदेचे अधिवेशन सुरू असताना अगुस्तावेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहाराबाबत निवेदन जारी केल्याबद्दल काँग्रेसने संरक्षण मंत्रालयाविरुद्ध शुक्रवारी राज्यसभेत हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली.राज्यसभेचे सत्र सुरू असल्यामुळे संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात हे निवेदन करायला हवे होते, असे नोटीस देणारे काँग्रेसचे खासदार शांताराम नाईक व हुसेन दलवाई यांनी म्हटले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. अधिवेशनाच्या कालावधीत सरकारी संकेतस्थळावर स्पष्टीकरण देणे हा सभागृहाच्या तसेच सदस्यांच्या अधिकारांचा भंग असल्याचे काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे.