अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत बहरलेले भारत-अमेरिका संबंध नव्या वाटेवर नेण्याचा संकल्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी जाहीर केला. पर्यावरण व आरोग्यविषयक समस्या, दहशतवाद यांचा एकत्रितपणे सामना करण्याचा निर्धार करतानाच विकासाच्या वाटेवर जोडीने पावले टाकण्याची ग्वाही दोन्ही देशांच्या नेत्यांनी जाहीर केले.
गेल्या चार दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हाईटहाऊस येथे ओबामा यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य कराराचे १० वर्षांसाठी नूतनीकरण केल्यानंतर मोदी आणि ओबामा यांच्यात विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. नागरी अणुसहकार्य करार राबवण्यात येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. त्यासोबतच अमेरिकेच्या सेवाक्षेत्रात भारतीय कंपन्यांना सहज वावर मिळावा, अशी मागणीही मोदी यांनी ओबामांकडे केली. ‘मी या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होण्याबाबत आशावादी आहे,’ असे ओबामा यांनी भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले. या चर्चेत केवळ मतैक्याच्याच नव्हे तर मतभेदाच्या मुद्दय़ांवरही खुलेपणाने चर्चा झाली. शेतकऱ्यांना विकसित देशांकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा मुद्दा, जागतिक व्यापार परिषदेतील भारताची भूमिका, यांवर दोन्ही नेत्यांनी परस्परांची मते आणि भूमिका जाणून घेतल्या. व्यापारास प्रोत्साहन देण्यावर माझाही भर आहेच, मात्र विकसनशील राष्ट्रांमधील अन्नसुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मोदींनी नमूद केले.  
अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच पश्चिम व दक्षिण आशियातील दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे ओबामा आणि मोदी यांनी मान्य केले.