तामिळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या गटाची दिलजमाई झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी येथील राजकारणाने नवे वळण घेतले आहे. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या मनोमीलनानंतर अण्णा द्रमुकमधील (एआयएडीएमके) संघर्ष संपला असे वाटत होते. मात्र, मंगळवारी सकाळी अण्णा द्रमुकचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांच्या समर्थकांनी बंडखोरी केल्याने तामिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आज सकाळी या १९ बंडखोर आमदारांनी टीटीव्ही दिनकरन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर काही वेळातच ते राजभवनात पोहचले. यावेळी त्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, बंडखोर आमदारांनी राजभवनात येण्यापूर्वी मरीना बीच येथील जयललिता यांच्या समाधीचे दर्शनही घेतले होते. या ठिकाणी त्यांनी काही काळ प्रार्थना केली. त्यानंतर हे बंडखोर आमदार ई. पलानीस्वामी सरकारविरोधातील अविश्वास ठराव घेऊन राजभवनात पोहचले. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी केली.

तत्पूर्वी काल अण्णा द्रमुकमधील (एआयएडीएमके) माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी हे दोन्ही गट एकत्र आले. सविस्तर चर्चेनंतर दोन्ही गटांनी विलीनीकरणाची घोषणा केली. पनीरसेल्वम यांची पक्षाच्या निमंत्रकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पलानीस्वामी हे सह- निमंत्रक असतील. याशिवाय पनीरसेल्वम यांना तामिळनाडूत उपमुख्यमंत्रीपदही दिले जाईल. जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाची धूरा हाती घेतली. शशिकला गटाविरोधात पनीरसेल्वम यांनी बंडाचा झेंडा फडकावला. यानंतर पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र यादरम्यान शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि एआयडीएमकेची बिकट अवस्था झाली. आमदारांनी विधीमंडळ पक्षनेतेपदी ई. पलानीस्वामी यांची निवड केली आणि पलानीस्वामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. पनीरसेल्वम आणि पलनीस्वामी गटातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. पक्षाच्या निवडणूक चिन्हावरुन दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही गटांमध्ये चर्चादेखील सुरु होती. अखेर काल या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची घोषणा केली. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर आता तामिळनाडूत एआयएडीएमकेची ताकद वाढली आहे. अम्मासाठी (जयललिता) आम्ही एकत्र आलो असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.