ओ. पनीरसेल्वम यांची माहिती; चर्चा सुरळीत

अद्रमुकच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक घडामोड एकदोन दिवसांत अपेक्षित आहे, असे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी सांगितले. अद्रमुकच्या अम्मा गटाचे नेते पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र भेटले व त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर चर्चा केली. त्यात आगामी कृती योजना तयार करण्यावर विचारविनिमय झाला.

पनीरसेल्वम हे उद्या मदुराईला जात असून तेथे ते एका बैठकीस उपस्थित राहणार आहेत. नंतर ते पुन्हा चेन्नईत येऊन विलीनीकरणाच्या मुद्दय़ावर दोन्ही गटांतील नेत्यांची मते जाणून घेतली, सध्या तरी चर्चा सुरळीत सुरू असून एकदोन दिवसांत सकारात्मक घडामोडी होतील असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे तंजावर जिल्हय़ात तंजावरला गेले असून, तेथे ते एमजीआर यांच्या शताब्दी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  ओपीएस गटातील नेत्यांनी परस्परविरोधी मते व्यक्त केल्याने काल रात्री झालेल्या बैठकीत विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाले नाही. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. प्रत्यक्षात या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अम्मा गट व ओपीएस गट यांच्यात मंत्रिपदावरून सौदेबाजी सुरू आहे. दरम्यान, बाजूला पडलेले अद्रमुकचे उप सरचिटणीस टी. टी. व्ही. दिनकरन यांनी त्यांच्या समर्थकांशी निवासस्थानी चर्चा केली.

दिनकरन यांनी काल वार्ताहरांना सांगितले, की अद्रमुकचे विलीनीकरण झाले तरी ते फार काळ टिकणार नाही. विलीनीकरणाच्या चर्चेनंतर अद्रमुकच्या दोन्ही गटांचे आमदार मरिना बीच येथे जयललिता यांच्या स्मारकाजवळ जमले होते. पलानीस्वामी व पनीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या स्मारकांवर वाहण्यासाठी पुष्पचक्रे तयार ठेवण्यात आली होती, पण विलीनीकरणाची चर्चा लांबणीवर पडल्यानंतर पुन्हा सामान्य लोकांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली.