तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा एक हितचिंतक गमावला असला तरी मोदी सरकारला राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे. जयललितांच्या निधनाने पोरक्या झालेल्या अण्णाद्रमुकच्या लोकसभेतील ३७ आणि राज्यसभेतील १३ खासदारांना स्वत:च्या पंखाखाली घेण्याचा भाजपचा इरादा आहे. तसे झाल्यास विशेषत: राज्यसभेत सरकारला मोठा दिलासा मिळू शकतो.

‘जयललितांच्या पश्चात अण्णाद्रमुकचे भवितव्य दोलायमान आहे. स्पष्ट राजकीय वारसदार नसल्याने तर गुंता आणखीनच वाढला आहे. अशा स्थितीत अस्थिर परिस्थितीमध्ये अण्णाद्रमुकच्या ५० खासदारांचा कळप आयताच भाजपच्या हाती लागू शकतो. भवितव्याच्या भीतीने सैरभर होणाऱ्या या खासदारांना राजकीय स्पष्टता येईपर्यंत तरी आमच्याशिवाय दुसरा राजकीय पर्याय दिसत नाही,’ असे मत भाजपच्या एका राष्ट्रीय सरचिटणीसाने वर्तविले. ‘अशा धुरकट स्थितीत केंद्रातील सरकारशी सौहार्दाचे नाते ठेवण्यातच त्यांचे हित राहील,’ अशीही टिप्पणी त्याने केली.

[jwplayer YAIUOjFy]

बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती यांसारख्या पक्षांप्रमाणे अण्णाद्रमुकने भाजप व काँग्रेसपासून समान अंतर राखले आहे. संसदेत पाठिंबा अथवा विरोधाची सरसकट भूमिका घेण्याऐवजी मुद्दय़ांवर आधारित भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसते. बहुतेक वेळा ती सरकारच्या पथ्यावर पडली आहे. त्यात कट्टर प्रतिस्पर्धी द्रमुकने विधानसभेला काँग्रेसशी युती केल्याने तर अण्णाद्रमुक भाजपच्या दिशेने आणखी ढकलला आहे. यातूनच सरकारची कठोर परीक्षा पाहणाऱ्या प्रश्नांवर त्यांनी टोकाची भूमिका घेतलेली नाही. संख्याबळ नसलेल्या राज्यसभेत तर सरकारची फटफजिती रोखण्यासाठी अण्णाद्रमुक नेहमीच उपयोगी पडला आहे. अण्णाद्रमुक सत्तेत सहभागी नाही, पण त्यांचे एम. थंबीदुराई लोकसभेचे उपसभापती आहेत. लोकसभेत अण्णाद्रमुकची फारशी गरज नाही, पण राज्यसभेमध्ये त्यांचे १३ खासदार सरकारसाठी मोलाचे ठरू शकतात.

शिवाय, मोदी आणि जयललिता यांच्यामध्ये उत्तम सहकार्याचे नाते होते. २०१२मध्ये मोदींच्या शपथविधीसाठी त्या खास गांधीनगरला गेल्या होत्या. पण श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना शपथविधीचे निमंत्रण दिल्याने त्यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीवर बहिष्कार घातला होता. पण एकुणात मोदींबरोबरील त्यांचे नाते सौहार्दाचे, सहकार्याचे राहिले. मोदींव्यतिरिक्त अरुण जेटली, अमित शहा यांच्याबरोबर त्यांचे उत्तमपणे जमायचे.

जयललितालोकप्रियता

तामिळनाडूत जयललितांना अम्मा म्हणजेच आई म्हणत. ही बाब त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येण्यास पुरेशी आहे, असे म्हटले जाते.

  • अम्मा उपाहारगृह : राज्यातील सर्व शहरांमध्ये न्याहरी आणि भोजन स्वस्त दरात मिळण्यासाठी अम्मा उपाहारगृहे उघडण्यात आली.
  • अम्मा मिनरल वॉटर : सर्व प्रमुख शहरे आणि रेल्वे स्थानकांमध्ये बाटलीबंद पाणी केवळ १० रुपयांना .
  • अम्मा फार्मसी : सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये अम्मा फार्मसी सुरू करण्यात आली असून तेथे स्वस्त दराने औषधे मिळतात.
  • अम्मा बेबीकिट : नवजात अर्भकांसाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू मोफत दिल्या जातात.
  • अम्मा सॉल्ट : २०१४ मध्ये
  • ही योजना सुरू. २५ रुपये किलो या दराने विकण्यात येणारे मीठ १४ रुपये किलो दराने उपलब्ध.
  • अम्मा सिमेंट : गरिबांना घरे बांधण्यासाठी स्वस्त दराने सिमेंट .
  • अम्मा मोबाइल :  सर्व बचत गटांना मोफत अम्मा स्मार्ट भ्रमणध्वनी.
  • अम्मा मिक्सर : गरीब महिलांना अम्मा मिक्सर मोफत उपलब्ध.
  • अम्मा सिनेमा : राज्यात अम्मा चित्रपटगृहांसाठी सात जागा निश्चित. तेथे वाजवी दराने चित्रपट दाखविणार. त्याचबरोबर अम्मा दूरदर्शन, अम्मा विवाह सभागृह, अम्मा कॉलसेंटर, बी-बियाणे, चष्मा, मुलींना सायकल, मुलांना शाळेचे दप्तर, पुस्तके, गणवेश मोफत देण्यात येतात.
  • अम्मा लॅपटॉप : जवळपास २६ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप राज्यातील ११  लाख विद्यार्थ्यांना वाटण्याची योजना सुरू.

[jwplayer TSJf2gHS]