पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त मोठमोठ्या घोषणा करतात, मात्र त्यांची अंमलबजावणी सोयीस्करपणे विसरतात. गोरक्षणाच्या बाबतीत हिंसाचार सहन करणार नाही म्हणणाऱ्या मोदींनी असल्या हिंसाचारी लोकांनाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे, म्हणूनच गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना ठार करणाऱ्यांची हिंमत वाढते. समाजातल्या असल्या हिंसाचारी लोकांना भाजप आणि संघच पाठिंबा देत असतो. भाजपची ही नीती म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी आहे. अशी टीका एमआयएम या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.आहे. मोदींना हिंसा करणाऱ्यांचा एवढाच तिटकारा आहे तर मग राजस्थानमधून पहलू खानचे मारेकरी अजून मोकाट का आहेत? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमतीमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी आपली रोखठोक भूमिका मांडत त्यांनी गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारावर टीकेचे ताशेरे झाडले. गायीला वाचवातना माणूस कसा काय मारता? अशा हिंसाचाराचे कधीही समर्थन करणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यांच्या याच मुद्द्यावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. याआधीही दोनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचाराचे समर्थन करणार नाही, महात्मा गांधींच्या वाटेवर चालूया वगैरे संदेश दिले होते. मात्र त्यामुळे देशातला हिंसाचार कमी झाला नाही, उलट वाढला. जाहीर सभांमध्ये हिंसाचार विरोधी भूमिका पंतप्रधान मांडताना दिसतात. पण दुसरीकडे अशा हिंसाचार माजवणाऱ्या लोकांमागे भाजप आणि संघ यांचीच मानसिकता असल्याचे दिसून येते. जेव्हा घटना घडते, त्यानंतर सरकारतर्फे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्याचा निषेधही केला जात नाही. जाहीर सभांमध्ये जे बोलता त्याची अंमलबजावणी तुम्ही केली आहे का? असाही प्रश्न ओवेसी यांनी पंतप्रधानांना ट्विटद्वारे विचारला आहे.