आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पु्न्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘हा देश तुमच्या बापाचा नाहीये, तुम्ही राजकारणाला धार्मिक रंग दिला आहे, मुस्लिमांचाही या देशावर हक्क आहे’ असे अकबरूद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. तसंच, ” मुस्लिम असणे हा गुन्हा आहे का? टोपी घालणे हा गुन्हा आहे का? तुम्ही धर्माचे राजकारण करता ही बाब चुकीची आहे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांनी लक्षात ठेवावे भारत देश तुमच्या बापाचा नाहीये, जेवढा तो तुमचा आहे तेवढाच तो मुस्लिम बांधवांचाही आहे, असेही ओवसींनी म्हटले आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाचा अजिबात विकास झाला नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणुकांसाठी मतं मागतानाचा हा व्हिडीओ प्रसारमामध्यमांनी प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात अक्षरशः गरळ ओकली आहे. अत्यंत खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका करत मुस्लिम समाजाला मतं देण्याचे आवाहन केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेवरही खालच्या भाषेत टीका केली आहे. या देशात अखलाखची हत्या करण्यात आली, जुनैदची हत्या करण्यात आली, काही दिवसांपूर्वीच बलात्कार पीडितेवर अॅसिड हल्ला करण्यात आला, मुस्लिम समाजातल्या लोकांच्याच हत्या होत आहेत, देशातले सेक्युलर लोक उघड्या डोळ्यांनी हा तमाशा बघत आहेत का? असाही प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.

मुस्लिम समाजाला भारतात दुसऱ्या क्रमांकाचा दर्जा आहे अशात मिळणारी वागणूक मात्र अत्यंत वाईट आहे. डोक्यावर टोपी घालणे, दाढी ठेवणे, आमच्या पसंतीचे खाणे हे काय आमचे गुन्हे आहेत का? मुस्लिम समाजाच्या बांधवांनाच का मारले जाते आहे? असाही प्रश्न ओवेसींनी विचारला आहे. इतकेच नाही तर आपल्या वादग्रस्त भाषणात त्यांनी हिंदुत्त्व, हिंदू समाज आणि त्यांचे नेते यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मुस्लिम समाजाला कोणाच्या मदतीची किंवा कृपेची गरज नाहीये असेही त्यांनी म्हटले आहे.

संसदेत फक्त मुस्लिम विरोधी कायदे तयार होतात असेही ताशेरे त्यांनी आपल्या भाषणात झाडले आहेत. मी बिफ खातो आणि जोवर जिवंत आहे तोवर खात राहणार मला अडवणारे तुम्ही कोण? असेही ओवेसी यांनी विचारले आहे. हा व्हिडीओ ३० जानेवारी २०१७ रोजीचा आहे. हैदराबादच्या बाबा नगरमध्ये नगरपालिका निवडणुकांचा प्रचार करत होते. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. एकाही गांधीमुळे देशाचे भले झाले नाही, त्यांच्या हातातून देश आता धर्मांध शक्तींच्या हाती गेला असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.अकबरुद्दीन ओवेसींच्या या व्हिडीओमुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.