कॉपी व इतर गैरप्रकारांमुळे रद्द करण्यात आलेली अखिल भारतीय वैद्यक प्रवेश पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) २५ जुलै रोजी पुन्हा घेण्याची घोषणा मंगळवारी सीबीएसई मंडळाने केली. यापूर्वी १५ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले होते. आधीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने १५ जून रोजी अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा रद्द केली होती व चार आठवडय़ात पुन्हा परीक्षा घेण्याचा आदेश दिला होता. मात्र, इतक्या कमी कालावधीत फेरपरीक्षा घेऊन निकाल लावणे शक्य नसल्याने न्यायालयाकडे आणखी कालावधीची मागणी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा कालावधी वाढवून देत सीबीएसईला १७ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्यास सांगितले होते.