धार्मिक आधारावर दाढी वाढवल्याने भारतीय हवाई दलातून निलंबित करण्यात आलेल्या जवान मकतुम हुसेन यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हवाई दलाचे कर्मचारी सेवेत असेपर्यंत दाढी वाढवू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सेवेत असताना दाढी वाढल्याने मकतुम हुसेन यांना हवाई दलातून निलंबित करण्यात आले होते.

दाढी वाढल्याने हवाई दलातून निलंबित केलेल्या मकतुम यांनी याआधी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कर्नाटक उच्च न्यायालयात मकतुम यांची निराशा झाली. हवाई दलात असेपर्यंत जवानांना दाढी वाढवता येणार नाही, असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालायाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल कायम राखला आहे.

हे संपूर्ण प्रकरण २००१ सालातील आहे. मकतुम हुसेन यांनी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरकरडे दाढी वाढवण्याची परवानगी मागितली होती. यासाठी मकतुम यांनी धार्मिक कारण दिले होते. कमांडिंग ऑफिसरने सुरुवातीला मकतुम यांना दाढी वाढवण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर दाढी वाढवण्याची परवानगी फक्त शिखांनाच असल्याची गोष्ट लक्षात आली.

यानंतर मकतुम हुसेन यांना देण्यात आलेली दाढी वाढवण्याची परवानगी रद्द करण्यात आली. हा सर्व भेदभावाचा प्रकार असल्याची मकतुम हुसेन यांची भावना होती. त्यामुळेच मकतुम यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दाढी न केल्याने मकतुम यांची बदली पुण्याच्या कमांड रुग्णालयात करण्यात आली. याठिकाणी नव्या कमांडिंग ऑफिसरनेदेखील मकतुम यांना दाढी न ठेवण्याची सूचना केली. मात्र तरीही मकतुम त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर मकतुम यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. यानंतरही दाढी ठेवण्याच्या भूमिकेवर राहिल्याने आणि वरिष्ठांचे आदेश न पाळल्याने मकतुम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.