बेशिस्त वर्तन आणि कामावरील सेवाशर्तीच्या नियमभंगप्रकरणी कामावरून कमी करण्यात आलेल्या एअर इंडियाच्या १७ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही, असे व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. हे सर्वजण ‘कॅबिन क्रू’ आहेत.
कर्मचारी संघटनेने आपली दिशाभूल केल्याचा आरोप करून या १७ जणांपैकी १३ कर्मचाऱ्यांनी बिनशर्त माफी मागितली असल्याचे एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये १६ हवाईसुंदरी व एक ‘फ्लाईट पर्सर’ आहे. त्यांच्यापैकी चारजण कंत्राटी आहेत. कंपनीच्या आवश्यकतेनुसार नेमून दिलेल्या कामावर उपस्थित राहणे तसेच ‘फ्लाइट डय़ूटी टाइम लिमिटेशन’संबंधी (एफडीटीएल) नियमांचे पालन, हजेरीसंबंधीचे नियम पालन आदी बाबी मान्य करण्याचे या कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात लिहून दिले आहे. असे असले तरी व्यवस्थापनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याच्या मुद्दय़ावर ‘ऑल इंडिया कॅबिन क्रू असोसिएशन’ने आंदोलन केल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांच्याशी चर्चा केली, मात्र त्यावेळी कोणताही तोडगा निघू शकला नाही.
कामचुकार वर्तन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांविरोधात व्यवस्थापनाने अत्यंत कठोर भूमिका घेऊन त्यांना थेट कामावरूनच काढून टाकले होते. या सर्वानी ‘एफडीटीएल’चे नियम पाळण्यासंबंधी त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत होते. परंतु त्यांनी सूचनांचे पालन न केल्यामुळे ही टोकाची कारवाई करावी लागली, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.