दिल्लीहून येथील नेडुम्बस्सेरी विमानतळावर उतरत असलेल्या विमानास गुरुवारी आग लागली. मात्र विमानातील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. या विमानाच्या मागील बाजूचा टायर फुटल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.
‘ए-१४६७’ जातीच्या या विमानात १२ कर्मचारी आणि १६१ प्रवासी होते. त्यांना नंतर सुखरूप हलविण्यात आले. सदर विमान सकाळी सव्वानऊच्या सुमारास उतरत असताना त्यामध्ये धूर आलेला दिसला. अधिक तपासणीनंतर विमानाच्या मागचा टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले. नंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी बंगळुरू येथून तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले. हे विमान नंतर शारजा येथे जाणार होते.