एअर इंडिया लि. आणि बीएसएनएल यासह केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील ४३ कंपन्यांना गेल्या तीन वर्षांपासून (२०१३-१६) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली.

स्रोतांचा अभाव, कमी क्षमतेने वापर, तेल प्रकल्प आणि यंत्र, स्पर्धात्मक वातावरण, दुबळे पणन आणि गैरव्यवस्थापन ही तोटा सहन करावा लागण्याची काही प्रमुख कारणे आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबाबत केलेल्या पाहणीत आढळले आहे की, ४३ कंपन्यांना २०१३ ते २०१६ या कालावधीत सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे, असे अवजड उद्योग विभागाचे राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी सांगितले.

या ४३ कंपन्यांसह ब्रिटिश इंडिया कॉर्पोरेशन, हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स, एचएमटी वॉचेस लि. आणि इंडियन ड्रग अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनाही तोटा सहन करावा लागला आहे, असेही सुप्रियो म्हणाले. हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशनचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ ही कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत, बांबू खरेदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचा आरोप होत आहे, असेही ते म्हणाले. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे.