एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एअर इंडिया आणि मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याने खासदार गायकवाड यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर खासदार गायकवाड यांनीही एअर इंडियाविरोधात तक्रार दाखल केली असून, कर्मचाऱ्याने धक्काबुक्की आणि आरडाओरडा केल्याचे म्हणणे गायकवाड यांनी मांडले आहे. बिझनेस क्लासचे तिकीट असूनही मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. एअर इंडियाने खासदार गायकवाड यांना काळ्या यादीत टाकले आहे. मात्र तरीही ‘माझ्याकडे तिकीट असल्याने ते मला काळ्या यादीत टाकू शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांचे आज संध्याकाळचे तिकीट रद्द केले. तर देशातील सर्वच एअरलाईन्सने गायकवाड यांच्यावर बंदी घातली आहे. एअरलाईन असोसिएशनकडून रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. एअर इंडियाकडूनदेखील संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

देशातील सर्वच आघाडीच्या एअरलाईन्सने खासदार गायकवाड यांच्यावर बंदी घातल्यानंतर एअर इंडियाच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तर गायकवाड यांनीही एअर इंडियाविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने मला धक्काबुक्की केली आणि माझ्याशी गैरवर्तन केले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. गायकवाड यांचे एअर इंडियाने तिकीट रद्द केल्यानंतर केंद्रीय कायदा आणि सामाजिक न्यायराज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणावरही प्रवासबंदी आणि तिकीट रद्द करणे हे कायद्याला धरुन नाही. गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण कुणालाही तिकीट नाकारणे हे चूक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.