वाढते वायू प्रदूषण मुंबई आणि दिल्लीकरांसाठी जीवघेणे ठरते आहे. २०१५ मध्ये मुंबई आणि दिल्लीतील ८०,६५५ जणांना प्रदूषणामुळे अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. १९९५ ते २०१५ या २० वर्षांच्या कालावधीत मुंबई आणि दिल्लीतील प्रदूषणात दुपटीने वाढ झाली आहे. मुंबईतील आयआयटीच्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

आर्थिक परिभाषेनुसार गेल्या वर्षभरात वायू प्रदुषणामुळे २०१५ या वर्षात मुंबई आणि दिल्लीचे तब्बल ७० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. ही रक्कम देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ०.७१% इतकी आहे. मुंबई आणि दिल्लीतील प्रदूषणात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होते आहे. याचा मोठा आणि गंभीर परिणाम मुंबईकर आणि दिल्लीकरांच्या आरोग्यावर होतो आहे.

वाढते औद्योगिकीकरण, बांधकाम, वाहनांची प्रचंड संख्या यामुळे मुंबई आणि दिल्लीतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदुषणामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतदेखील गेल्या दोन दशकांमध्ये मोठी वाढ झाल्याचे मुंबई आयआयटीच्या अभ्यासातून समोर आले आहे. १९९५ मध्ये दिल्लीत वायू प्रदूषणामुळे १९,७१६ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये हा आकडा ४८,६५१ वर जाऊन पोहोचला आहे. मुंबईत १९९५ मध्ये वायू प्रदूषणामुळे १९,२९१ लोकांना जीव गमवावा लागला होता. हाच आकडा २० वर्षानंतर ३२,०१४ इतका झाला आहे.

मुंबई आणि दिल्लीचतील रहिवाशांच्या आरोग्यासोबतच वाढत्या प्रदूषणाचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. मुंबई आणि दिल्लीतील प्रदुषणामुळे २०१५ मध्ये देशाचे तब्बल १०.६६ बिलियन अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास हे नुकसान ०.७१% इतके आहे. १९९५ च्या तुलनेत वायू प्रदूषणामुळे झालेले आर्थिक नुकसान दुप्पट झाले आहे.