देशातील विदारक स्थिती; ‘लॅन्सेट’ नियतकालिकाचा अहवाल

शुद्ध हवा आणि पाणी.. निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या या अगदी प्राथमिक आणि निसर्गदत्त बाबी. मात्र, दुर्दैवाने देशात अनेकांच्या नशिबात हेही नसते. त्यामुळेच प्रदूषित हवेमुळे प्रतिमिनिट किमान दोन बळी जात असल्याचे विदारक सत्य उजेडात आले आहे. ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने केलेल्या अभ्यासात हे वास्तव आढळून आले असून राजधानी दिल्ली आणि पाटणा ही दोन शहरे अत्यंत प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘द लॅन्सेट’ या नियतकालिकाने जगभरातील प्रदूषणाबाबत अहवाल जारी केला असला तरी त्याला २०१० सालातील आकडेवारीचा आधार आहे. मात्र, असे असले तरी या अभ्यास अहवालामुळे देशातील प्रदूषणपातळीबाबत पुढे आलेले भीषण वास्तव नजरेआड करता येत नाही. देशातील वायूप्रदूषण एवढय़ा उच्च पातळीवर पोहोचले आहे की, मिनिटाला किमान दोघांचा बळी त्यामुळे जातो तर दरवर्षी दहा लाख भारतीयांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे होतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय जगात अत्यंत प्रदूषित असलेल्या शहरांच्या यादीत नवी दिल्ली आणि पाटणा या दोन शहरांचाही समावेश आहे. हवामानातील बदल आणि हवेतील वाढते प्रदूषण या दोन्ही बाबी परस्परसंबंधित असून त्यामुळे देशातील हवेच्या प्रदूषणात उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.

अहवाल म्हणतो..

  • उत्तर भारतातील धुक्याचे वाढते प्रमाण धोकादायक
  • जागतिक बँकेच्या अंदाजानुसार प्रदूषणामुळे भारतीय कामगारांचे ३८ अब्ज डॉलरचे नुकसान
  • पाटणा व नवी दिल्ली या शहरांच्या हवेत बारीक धुलिकण हृदयासाठी अत्यंत धोकादायक
  • वायूप्रदूषण हा प्रदूषणाचा प्राणघातक प्रकार. जागतिक अर्थव्यवस्थेत त्यामुळे २२५ अब्ज डॉलरचे नुकसान
  • २.७ ते ३.४ दशलक्ष जन्म वायुप्रदूषणाशी संलग्न असण्याची शक्यता
  • जगभरात दररोज १८ हजार बळी एकटय़ा वायूप्रदूषणामुळे जातात. भारतात दरवर्षी दहा लाख बळी