वायुप्रदूषणाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होत असतो. पण जी मुले सातत्याने वायुप्रदूषणाच्या संपर्कात येतात, ती नेहमीच आजारी राहतात, परिणामी त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही होतो, असे मत अमेरिकी आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या आरोग्यतज्ज्ञांनी टेक्सासमधील काही शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. ज्या मुलांची घरे रस्त्याजवळ आहेत, ज्यांचा संपर्क सातत्याने वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या वायूशी येतो, अशा मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. शालेय परीक्षेत चांगले गुण मिळविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. प्रदूषणामुळे सातत्याने आजारी पडल्याने त्यांच्या गुणांवरही परिणाम झाला, असे या आरोग्यतज्ज्ञांना दिसले. विषारी वायुप्रदूषके सोडणाऱ्या परिसरात राहणाऱ्या मुलांना नेहमीच कमी गुण मिळत असल्याचेही दिसून आले. शाळेतील शैक्षणिक प्रगती व प्रभावही त्यांचा कमी असल्याचे दिसते, असे सारा ई. ग्रिनेस्की यांनी सांगितले.
टेक्सास विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक असलेल्या ग्रिनेस्की यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यतज्ज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात अहवाल तयार केला आहे. आरोग्यतज्ज्ञांनी हा आढावा घेताना विविध शाळांतील १,८९५ विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी चर्चा केली. हा अभ्यास करताना कुटुंबाचा आर्थिक स्तर, पालकांचे शिक्षण, घराचे ठिकाण आणि ते कोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खातात हेही लक्षात घेतले.
शिक्षणावर
परिणाम कसा?
वायुप्रदूषणामुळे मुले सातत्याने आजारी पडतात. त्यांना श्वसनाचे विकार, दमा, संसर्गजन्य आजार जडतात. त्यामुळे ते सातत्याने शाळेत गैरहजर राहतात. त्यामुळे शाळेतील प्रगतीवर परिणाम होतो.
वायुप्रदूषणाचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावरच नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होतो. विषारी वायुप्रदूषकांमुळे विद्यार्थ्यांच्या मेंदुविकास व चेतासंस्थेवर दुष्परिणाम होतात. त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.