एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी सीबीआयने माझ्या मुलाला त्रास देण्याऐवजी माझी चौकशी करावी, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी आपला संताप व्यक्त केला. तपास यंत्रणा चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणेने २००६ मध्ये झालेल्या एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात विदेशी गुंतवणुकीप्रकरणी गुरूवारी कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी बोलावले होते. चिदंबरम अर्थमंत्री असताना या व्यवहाराला परवानगी देण्यात आली होती.

कार्तीने सीबीआयसमोर चौकशीसाठी जाण्यास नकार दिला होता. एका विशेष न्यायालयाने सर्व आरोपातून मुक्त केले होते. आणि याप्रकरणाची सुनावणी संपली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. चिदंबरम यांनी एकामागे एक ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. एअरसेल-मॅक्सिसमध्ये एफआयपीबीने (विदेशी गुंतवणूक बोर्ड) शिफारस केली होती. मी या कार्यवाहीच्या विवरणाला मंजुरी दिली होती. सीबीआयने माझी चौकशी केली पाहिजे. कार्तीला त्रास देऊ नये, असे ट्विट त्यांनी केले. आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले, निराश सीबीआय चुकीची माहिती पसरवत आहे. एअरसेल-मॅक्सिसमध्ये एफआयपीबीच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयसमोर आपला जबाब नोंदवला असून त्यांनी ही मंजुरी वैध असल्याचे त्यात म्हटले आहे.

एका विशेष न्यायालयात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मॅक्सिसची मॉरिशस येथील सहायक कंपनी मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेस होल्डिंग्ज लि.ने एअरसेलमध्ये ८० कोटी अमेरिकन डॉलर गुंतवणुकीसाठी मंजुरी मागितली होती (सध्याच्या विनिमय दरानुसार ही रक्कम ५,१२७ कोटींपर्यंत जाते). आर्थिक प्रकरणांची कॅबिनेट समिती (सीसीईए) याला मंजुरी देण्यास सक्षम होती. एजन्सीने २०१४ मध्ये म्हटले होते की, अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यामुळे एफआयईपीबी परिस्थितीच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे. याच्याशी निगडीत प्रकरणांचाही तपास केला जात आहे.