कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा एअरलिफ्ट मोहीम राबवणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीनंतर कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी विशेष विमानसेवा सुरु केली जाणार आहे. कतारमध्ये सुमारे सात लाख भारतीय अडकले आहेत.

बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात अशा सुमारे सात देशांनी कतारसोबतचे राजनैतिक संबंध तोडले आहेत. त्यामुळे कतारची कोंडी झाली असून कतारमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. कतारमध्ये जीवनावश्यक वस्तू पाठवणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबिया आघाडीवर आहे. पण याच देशाने कतारशी संबंध तोडल्याने कतारच्या अडचणीत भर पडली आहे. शेजारी राष्ट्रांकडून कोंडी झाल्याने कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोहामध्ये सुमारे सात लाख भारतीय अडकून पडले आहेत.

भारतीयांच्या ‘घरवापसी’साठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत स्वराज यांनी भारतीयांच्या सुटकेसाठी दोहा आणि भारतादरम्यान विशेष विमानसेवा सुरु करण्याची विनंती केली. दोहामध्ये असंख्य भारतीय अडकले असून त्यांना भारतात परतण्यासाठी तिकीट मिळत नसून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी केली होती. गणपती राजू यांनीदेखील सहकार्याची तयारी दर्शवली होती.  ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ दोहा आणि केरळमध्ये २५ जून ते ८ जुलै या कालावधीत विशेष विमान सेवा सुरु करणार आहे. याशिवाय जेट एअरवेज मुंबई- दोहा दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवारी विशेष विमान सोडणार आहे.

५ जूनरोजी सौदी अरेबियाने कतारलगत जमिनीवरची सीमा बंद केल्याने कतारचा अरबी द्वीपकल्पाशी संबंध तुटला होता. कतारने इस्लामी गटांना पाठिंबा दिला असून, इराणशी जवळिकीचे संबंध ठेवले आहेत, त्यामुळे या देशांनी कतारशी संबंध तोडल्याचे सौदी आणि अन्य देशांनी म्हटले आहे.