देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी आपल्या ‘हॉलिडे सरप्राइझ’ ऑफरची मुदत ३ महिन्यांनी वाढवली आहे. कंपनीने ही ऑफर याचवर्षी एप्रिल महिन्यात सादर केली होती. जुलै महिन्यात ऑफरची मुदत संपणार होती. आता कंपनीने नव्या नावाने ही ऑफर पुन्हा एकदा सादर केली असून कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. कंपनीने निवेदनात याला ‘मान्सून सरप्राइझ’ असे नाव दिले आहे. यामध्ये पोस्टपेड ग्राहकांना तीन महिन्यासाठी ३० जीबी डेटा देण्यात येणार आहे. ग्राहक एका महिन्यात १० जीबी डेटा वापरू शकतो.

भारती एअरटेलची सीईओ गोपाळ विठ्ठल यांच्या इ-मेल मध्ये म्हटलं आहे की, मान्सूनचा हंगाम सुरू होण्याबरोबर आम्ही आमच्या ग्राहकांना नवीन डेटा ऑफर देत आहोत. सरप्राइझ ऑफर आणखी तीन महिन्यांसाठी वाढवत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. यासाठी पोस्टपेड ग्राहकांना My Airtel App वर १ जुलैनंतर क्लेम करावे लागेल.

ज्या एअरटेल ग्राहकांकडे एअरटेल अॅप नाही. त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना ऑफर क्लेम करता येईल. ही ऑफर फक्त एअरटेल पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे.

काय आहे एअरटेलची १००० जीबी ऑफर

यापूर्वी एअरटेलने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली होती. त्या अंतर्गत एअरटेल त्यांना १ हजार जीबी डेटा मोफत देत आहे. हा डेटा एका वर्षांसाठी आहे. जे ग्राहक १६ मे किंवा त्यानंतर ब्रॉडबँड कनेक्शन घेतले आहे. त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही ऑफर केवळ दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात देण्यात येत आहे. कंपनीने एअरटेल बोनस ऑफर १६ मे रोजी सादर केली होती. जे ग्राहक १०९९, १२९९, १४९९ आणि १७९९ रूपये ब्रॉडबँड प्लॅन वापरत आहेत. त्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. तर जे ग्राहक ८९९ रूपयांचा प्लॅन वापरत आहेत. त्यांना ७५० जीबी डेटा मोफत देणार आहे. त्याचबरोबर कंपनी या प्लॅनबरोबर अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा देत आहे.