चीनसमवेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी एनडीए सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवल यांची भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता दोवल यांच्या स्तरावर ही चर्चा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चीनसमवेत सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरविण्याबाबतची चर्चा करण्यासाठी अजित दोवल यांची भारताचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयातून प्रसृत करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘एनएसए’वर एकूणच जी कामगिरी सोपविण्यात आली आहे त्याचाच ही नियुक्ती हा एक भाग आहे. एनएसएला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. मे महिन्यात एनएसए म्हणून नियुक्ती करण्यात आली असली तरी दोवल यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली नव्हती.
सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने २००३ मध्ये विशेष प्रतिनिधी नियुक्त करून एक यंत्रणा उभी केली. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी या पातळीवर चर्चेच्या १७ फेऱ्या झाल्या असून त्यामधून काही प्रमाणात प्रगती झाली आहे.