वॉरेन बफे यांच्या नेतृत्वाखालील बर्कशायर हॅथवेचे वारसदार म्हणून भारतीय वंशाचे अजित जैन व ग्रेग अ‍ॅबेल यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यांची कामगिरी जागतिक दर्जाची असल्यानेच त्यांची नावे पुढे आली आहेत.
बफे यांनी भागधारकांना पाठवलेल्या पत्रात जैन यांची प्रशंसा केली आहे. ६३ वर्षांचे  जैन हे सध्या बर्कशायर रिइन्शुरन्स ग्रुपचे व्यवस्थापन बघत असून त्यांनी गेल्या काही वर्षांत हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढवला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष चार्लस मुंगेर यांच्याकडे सूत्रे देण्याचा त्यांचा विचार होता, पण तो ऐनवेळी बदलला व त्यांनी जैन व अबेल यांची नावे जाहीर केली, अबेल हे बर्कशायर एनर्जीचे प्रमुख आहेत.
आपले वारसदार हे सुमार कामगिरीचे नसतील तर सर्वोच्च कामगिरी करणारे असतील, हेच बफे यांनी जैन व अबेल यांची नावे मांडून दाखवले आहे, असे मत मुंगेर यांनी भागधारकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
जैन किंवा अबेल यांच्यापैकी कुणीही बर्कशायर सोडणार नाही; मग दुसरे कुणी काहीही देऊ केले तरी ते जाणार नाहीत अशी आशा आहे व त्या दोघांकडून बर्कशायरच्या प्रणालीत बदल होण्याची अपेक्षा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
जैन यांचा जन्म ओडिशातील असून ते आयआयटी व हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत. ३० वर्षे ते बफे यांच्यासमवेत काम करीत आहेत. आपला मुलगा हॉवर्ड हा अकार्यकारी अध्यक्ष राहील असे बफे यांनी जाहीर केले असून, त्याला पैसे मिळणार नाहीत. तो संचालकांना आवश्यक असलेल्या कामाव्यतिरिक्त कुठल्याही कामात वेळ वाया घालवणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.