अजमेर शरीफ दर्ग्याचे पीर सैयद फख्र काजमी चिश्ती यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र मोदींनी आपल्या टि्वटर खात्यावर पोस्ट केले असून, अजमेर शरीफ दर्ग्याच्या प्रतिनिधी मंडळासह साफा परिधान केलेले पंतप्रधान या छायाचित्रात दृष्टीस पडतात. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे पीर सैयद फख्र काजमी चिश्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्ग्याच्या उत्सवाला येण्याचे निमंत्रण दिल्याचे समजते.

पंतप्रधान मोंदींनी दिलेले भेटीचे निमंत्रण स्वीकारून काजमी नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी आले होते. लोकसभा कार्यालयात पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दर्गा प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधान मोदींना साफा बांधून त्यांना भेटवस्तू दिली. सय्यद रागिब चिश्तींनी मोदींना शाल भेट दिली.

आपण लवकरच अजमेर शरीफला भेट देणार असल्याचे पंतप्रधानांनी आश्वासन दिल्याचे काजमींनी सांगितले. काजमींबरोबरच्या प्रतिनिधी मंडळात काजमी आणि रागिब यांच्या व्यतिरिक्त सैयद अख्तर रजा चिश्ती, सैयद अकरम हुसैन चिश्ती आणि सैयद जिशान चिश्ती इत्यादींचा समावेश होता. एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधानांनी अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी पाठवली होती. पंतप्रधानांतर्फे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ती चादर दर्ग्यावर चढवली होती. दरम्यान, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सदभावना कार्यक्रमादरम्यान एका मौलवींनी मोदींना टोपी परिधान करण्याचा प्रयत्न केला असता मोदींनी त्यास नकार दिला होता. यावरून चांगलाच वाद रंगला होता.