मी नवा पक्ष काढणार आहे, असे अखिलेश यादव यांनी माझ्यासमोर म्हटले होते, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी केला. ते सोमवारी लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी शिवपाल यादव यांनी पक्षात बेशिस्त बिलकूल खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. समाजवादी पक्ष नेताजींमुळेच एवढ्या उच्च स्थानावर पोहचला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील प्रत्येकाने एकदिलाने काम करण्याची गरज आहे. जे लोक समाजवादी पक्षाला कमकुवत करण्याचे काम करण्याचे आणि आमच्याविरोधात काम करत आहेत, त्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही मुलायम सिंह यांच्या बळावर पुन्हा सत्तेत येऊ.

गेल्या काही दिवसांत समाजवादी पक्षात निर्माण झालेल्या यादवीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीला मुलायम सिंह, अखिलेश यादव आणि शिवपाल यादव उपस्थित आहेत. आज या बैठकीपूर्वी शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांचे समर्थक एकमेकांना भिडले. अखिलेश यादव आणि त्यांचे वडील मुलायमसिंग यादव यांच्यातील संघर्षांमुळे रविवारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला. एकीकडे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा अशा दोन नेत्यांनी परस्परांचे निष्ठावंत शिवपाल यादव व रामगोपाल यादव यांना पक्षातून निष्कासित केल्यानंतर पक्षातील संघर्ष कळसाला पोहोचला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यांनी त्यांचे काका व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासह इतर तीन ‘अमरसिंह समर्थक’ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला, तर त्यांचे वडील मुलायम यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थक पुतणे व सपचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निष्कासित करून लगेच प्रत्युत्तर दिले. या वेगवान घडामोडींना रविवारी सकाळी सुरुवात झाली.