माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारकडून काढण्यात येत असलेल्या श्वेत पत्रिकेवर टीका करत योगी आदित्यनाथ यांना सरकार चालवता येत नसल्याचा आरोप केला आहे. श्वेत पत्रिका म्हणजे खोटेपणा आहे. यामध्ये अनेक खोट्या बाबी सांगण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अजूनपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. हे शेतकरी पैसे मिळतील या आशेवर बसले आहेत. तर दुसरीकडे सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी दिल्याचे सांगत आहे. विशेष म्हणजे ऊस मंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले नाही, असा आरोप अखिलेश यांनी केला.

या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना धोका दिला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र वाटण्याची इतकी घाई होती की, त्यांनी ते प्रमाणपत्र तपासूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचे त्यांनी एक पैशांचे कर्ज माफ केले आणि त्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले. ही शेतकऱ्यांची कुचेष्ठा आहे. झाशी आणि गोरखपूरमध्ये मेट्रो आणण्याचे आदित्यनाथ स्वप्न पाहत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

आग्रा महामार्गाचे पुन्हा उद्घाटन करण्यावरूनही त्यांनी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. गोरखपूर येथील सरकारी रूग्णालयात झालेल्या बालमृत्यूवरून त्यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था ढेपाळल्याचा आरोप केला.