इंडियन मुजाहिदीन आणि अल-काईदा या दोनही दहशतवादी संघटना येत्या काही दिवसांमध्ये भारतात मोठय़ा प्रमाणात दहशतवादी कारवाया करणार असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. भारतात घातपात करण्यासाठी या दोनही संघटना एकत्र आल्या असून, देशातील अंतर्गत दहशतवादाला खतपाणी घालण्याची अल-काईदाची योजना आहे.
अल-काईदा आणि इंडियन मुजाहिदीन या दोनही संघटनांमध्ये झालेली सांकेतिक चर्चा आणि काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. भारतात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचे अपहरण करण्याची या दहशतवाद्यांची योजना आहे. त्याप्रमाणे सीरिया आणि इराक या देशांप्रमाणे भारतात मोठय़ा प्रमाणात दहशतवादी कारवाया करून अस्थिरता निर्माण करण्याचा कट या संघटनांनी आखला असल्याची माहिती गुप्तचर संघटनांनी दिली.
भारतातील अंतर्गत दहशतवादाला खतपाणी घालण्याचा मोठा डाव अल-काईदाने आखला आहे. भारतातील अनेक इस्लामी संघटना दहशतवादी कारवायांशी संबंधित आहेत. मात्र हा केवळ संशय असून, त्याबाबतचे कोणतेही सबळ पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणेकडे नाहीत. मात्र भारतातील दहशतवादाशी संबंधित असलेल्या संघटनांना हाताशी धरून दहशतवादी कृत्ये घडवून आणण्याची योजना आहे. त्यासाठीच अल-काईदाने इंडियन मुजाहिदीनशी जवळीक वाढविली असल्याचे गुप्तचर संघटनांनी सांगितले.
जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशात दहशतवादी हल्ले वाढणे हे खूपच धोकादायक असून, शेजारच्या पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे या कारवायांना वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.
वाघा ही झलक होती..
काही महिन्यांपूर्वी अल-काईदाने भारतीय उपखंडामध्ये संघटनेचे कार्यक्षेत्र वाढविणार असल्याची घोषणा केली होती. या पाश्र्वभूमीवरच ही संघटना सक्रिय झाली आहे. वाघा सीमेवर काही दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा या योजनेचाच भाग असल्याची माहिती पुढे आली आहे, असे गुप्तचर संघटनांनी सांगितले.