ओसामा बिन लादेन याच्या नियंत्रणाखालील ‘अल्-कायदा’ या दहशतवादी संघटनेत भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ‘तुम्ही आत्मघातकी मोहीम अमलात आणू इच्छिता काय?’ यासारखे भयंकर प्रश्न विचारले जात असत, असे उघडकीस आले आहे.
पाकिस्तानच्या अबोटाबाद येथील ओसामाच्या निवासस्थानी सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अल्-कायदामध्ये भरती होण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ‘नोकरीचा अर्ज’ ही होता. तीन पानांच्या प्रश्नपत्रिकेतून अल् कायदा आणि ‘वचनबद्ध दहशतवाद्यांचे शिस्तबद्ध जाळे’ असा संघटनेचा स्वत:बाबतचा दृष्टिकोन यांचे दर्शन होते.
या नोकरी-अर्जात एखादी कंपनी जॉइन करताना विचारावेत, त्याप्रमाणे इच्छुक जिहादींची ‘करिअर हिस्ट्री’, परदेशी भाषांबाबतचे कौशल्य यासारखे नेहमीचे ‘एचआर’ प्रश्न होतेच; शिवाय एखाद्या दहशतवादी संघटनेच्या प्रश्नपत्रिकेत असू शकतात, अशा भयंकर चौकशाही होत्या.
‘तुम्हाला आत्मघाती मोहीम राबवण्याची इच्छा आहे काय?’, ‘तुम्ही शहीद झालात तर आम्ही कुणाशी संपर्क साधावा,’ असे प्रश्न शेवटी विचारण्यात आले होते. ‘तुम्ही कुराण कितपत पाठ केले आहे?’, ‘तुमच्या कुटुंबीयांपैकी किंवा मित्रांपैकी कुणी सरकारमध्ये काम करते काय?’ अशाही प्रश्नांचा नोकरीच्या अर्जात समावेश होता.