मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवडय़ातील निर्णयाला शुक्रवारी विधानसभेत मंजुरी

पंजाबमध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरही यापुढे मद्य मिळणार आहे. पंजाब मंत्रिमंडळाने गेल्या शनिवारी घेतलेल्या निर्णयाला शुक्रवारी विधानसभेत मंजुरी देण्यात आली. हॉटेल, रेस्तरॉ आणि क्लबना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटपर्यंतच्या मद्यविक्रीला बंदी घातली होती. अपघातांच्या वाढत्या प्रमाणांमुळे ही बंदी घालण्यात आली होती. पंजाब विधानसभेत संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटपर्यंत बंदी हॉटेल, रेस्तरॉ आणि क्लबना लागू होणार नाही. तथापि, दारूविक्रीची दुकाने उघडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेले र्निबध कायम आहेत. पंजाब अब्रतारी कायदा १९१४ मधील कलम २६-एमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली. महामार्गावर दारूच्या दुकानांची जागा निश्चित करण्यासाठी ही मान्यता आहे, मात्र हॉटेल, रेस्तरॉ आणि क्लबना त्यामधून वगळण्यात आले आहे. पंजाबचे संसदीय कामकाजमंत्री ब्रह्म मोहिंद्रा यांनी विधेयक मांडले, त्याला अखेरच्या दिवशी मंजुरी देण्यात आली.